प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे
पंढरपूर : पंढरपूर येथे स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पद निर्माण करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

पंढरपूरच्या वाढत्या लोकसंख्येसह धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयाची आवश्यकता असल्याचे आमदार पाटील यांनी शासनाकडे पत्राद्वारे तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडले होते. त्यानंतर त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला.

पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीदरम्यान लाखो वारकरी दाखल होतात. याशिवाय वर्षभर धार्मिक कार्यक्रम, विविध व्हीआयपी दौरे, परदेशी पर्यटकांची ये-जा आणि वाढती लोकसंख्या यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

शासनाच्या या निर्णयामुळे पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि अकलूज उपविभागातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम होणार आहे. वरिष्ठ स्तरावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल तसेच मोठ्या धार्मिक उत्सवांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याने वारकरी, भाविक, नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. वारकरी संप्रदाय आणि लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय पंढरपूरसाठी ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
