हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक व शाहीर अमरजी पुणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगायन, भाषण व नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत आपले विचार मांडले.

अमरजी पुणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांग व्यक्ती हा समाजरचनेतील विविधतेने संपन्न असलेला विशेष घटक आहे. दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इनायतभाई शेख होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेशजी शिरोडकर, सुनील कथुरिया, एस. डी. शेख, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बक्षिसे व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा नानल यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
