छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा काढण्यात आला.

या महामोर्चात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर सहभागी झाले होते. तसेच संघाचे पदाधिकारी, कष्टकरी गटई बांधव, महिला पदाधिकारी आणि चर्मकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

अनुसूचित जातींच्या ५९ जातींची एकजूट अबाधित राहावी, यासाठी उपवर्गीकरणाला विरोध करण्यात येत असून महाराष्ट्रातील विविध तालुका व जिल्हास्तरांवर आंदोलन आणि मोर्चे सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारने उपवर्गीकरणाचे धोरण रद्द करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

उपवर्गीकरणाचा अहवाल रद्द करण्याबाबत सरकारकडून स्पष्ट घोषणा होईपर्यंत उपवर्गीकरणविरोधी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनावर विराट महामोर्चा काढण्यात येणार असून, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या ५९ जातींमधील लाखो समाजबांधव सहभागी होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

दरम्यान, २०२७ मध्ये होणाऱ्या जातीय जनगणनेनंतर अनुसूचित जातींची लोकसंख्या वाढण्याची शक्यता असून, अनुसूचित जातींना २० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी पुढील काळात करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अनुसूचित जातींच्या विकास, न्याय आणि हक्कांसाठी विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
