चिंचवड, दि. २८ जुलै : श्री गुरु गणेश बालक मंदिर, चिंचवड तसेच सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे गुरुपौर्णिमा आणि जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या प्रारंभानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व संस्कारमूल्य जोपासणाऱ्या उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी महर्षी वेदव्यास, त्यांचे शिष्य तसेच भगवान महावीर यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आकर्षक सादरीकरणातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा, गुरूंचे जीवनातील स्थान तसेच जैन धर्मातील चातुर्मास आणि पर्युषण पर्वाचे आध्यात्मिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.

गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मातृपूजन कार्यक्रमाने उपस्थितांना भावूक केले. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त केला. या प्रेरणादायी उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अॅड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमा आणि पर्युषण पर्वाच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृती, संस्कार आणि मानवी मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजन व पालकांविषयी आदरभाव, कृतज्ञतेची भावना, भारतीय संस्कृतीची जपणूक तसेच नैतिक व सामाजिक मूल्यांचे संवर्धन करण्याची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विशेष परिश्रम घेतले.
