|| प्रतिनिधी : क्षितीजा देव ||
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर जनतेचा रोष उफाळून आला आहे. आरोपीने गायीचे वासरू दाखवण्याचा बहाणा करून मुलीला गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याचे समोर आले. गुन्ह्यानंतर आरोपीने मृतदेह शेणात लपवून पळ काढला होता.

संध्याकाळी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसल्याने प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेनंतर नसरापूरसह संपूर्ण भोर तालुक्यात संतापाची लाट उसळली.

राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पुलावर रास्तारोको आंदोलन छेडले. आंदोलकांनी तब्बल चार तास मुंबई–बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प ठेवली. मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांशी वारंवार चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने अखेर रात्री उशिरा बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले. यावेळी पोलिसांनी मुलीच्या वडिलांची कॉलर पकडल्याचा तसेच लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी कोणताही लाठीचार्ज केला नाही किंवा कुटुंबीयांवर दबाव टाकलेला नाही. चर्चा करून परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर मुलीचे आई-वडील स्वखुशीने गाडीत बसले, असा दावा त्यांनी केला. तसेच काही बाहेरील लोक कुटुंबीयांना आंदोलनातून बाहेर पडू देत नव्हते, त्यांना हटवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर सुरू असून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल. तसेच पीडित कुटुंबीयांना त्यांच्या पसंतीचा वकील देण्यात येईल आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, रात्री उशिरा चिमुरडीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
