लोणावळा, दि. 23 जून : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अगरवाल (वय 25, रा. गहुंजे, ता. मावळ) याचा मृतदेह 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये आढळून आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सिया प्रविण गोयल (वय 20, रा. मार्केट यार्ड, पुणे) हिने किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या घटनेतील संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर व सखोल तपासाचे आदेश दिले. त्यानुसार दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली.

तपासादरम्यान सिया गोयल हिचे अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मृत केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत चेतन बाबूलाल चौधरी (वय 22, रा. कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. सियाचे लग्न केतन अगरवाल याच्यासोबत ठरले होते. मात्र तिला हे लग्न मान्य नसल्याने आणि केतन त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून दोघांनी कट रचल्याचा आरोप आहे.

पोलिस तपासानुसार, सिया गोयल हिने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेले. त्यानंतर पूर्वनियोजनानुसार प्रियकर चेतन चौधरी याला तेथे बोलावण्यात आले. संधी साधून दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून खाली ढकलल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे आणि पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
