पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील साने चौक येथे शनिवारी (दि. 21) सायंकाळी कोयता गँगने पुन्हा दहशत माजवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक ऊर्फ बाबू ननावरे (वय 24, रा. सुदर्शन नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सिद्धार्थ धाईजे (वय 21), शिवशंकर श्रीमंगल (वय 20) व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरसिंह ऑटो गॅरेज व जय अंबे इलेक्ट्रिकल्सजवळ झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने सपासप वार केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतिक कसाळकर यालाही मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपींनी कोयते हवेत फिरवत, “समोर याल तर एकेकाला बघून घेऊ,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गोमारे करीत आहेत.
