लोहगड : लोहगड किल्ल्यावर पत्नीसमवेत फिरण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 18 जून) सकाळी घडली. मृत तरुणाचे नाव केतन विशाल अगरवाल (वय 25) असे असून ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचे पुत्र होते.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल हे पत्नीसमवेत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाय घसरून ते किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती सकाळी 10.45 वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने बचाव पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. तसेच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ आणि लोहगडावरील कर्मचाऱ्यांनी दरीच्या पायथ्याशी शोधमोहीम सुरू केली होती. पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधकार्य अधिक वेगाने करण्यात आले. काही वेळातच केतन अगरवाल यांचा मृतदेह आढळून आला. मोठ्या उंचीवरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अत्यंत काळजीपूर्वक मृतदेह पांढऱ्या चादरीत गुंडाळून बास्केट स्ट्रेचरच्या सहाय्याने दरीतून सुरक्षित बाहेर काढला. दुपारी सुमारे 12.30 वाजता मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तसेच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

या बचाव व शोधकार्यात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व त्यांचे सहकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोहगडचे पोलीस पाटील, सरपंच व सदस्य, लोहगडावरील कर्मचारी, शिवदुर्ग रेस्क्यू टीम तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
बचाव कार्यात सहभागी शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य
सचिन गायकवाड, आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, विशाल पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना साखरे, समीक्षा साखरे, आर्यन साखरे, स्वप्निल मोकाशी, कैसर शेख, राजेंद्र कडू, योगेश दळवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
