हिंजवडी : प्रेमप्रकरणाच्या कारणातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना हिंजवडी परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली. या घटनेनंतर कारमधून पंढरपूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून ताब्यात घेतले.

दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी-भुमकर चौक, हिंजवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश झांबरे याचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा राग दिनेशच्या मनात होता.

याच रागातून गुरुवारी दिनेश संबंधित तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्याने दोघांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर आरोपी त्याच्या ताब्यातील हरटिगा कार (क्रमांक एमएच-१३-ईके-५८२८) मधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरच्या दिशेने पळून जात होता. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध सुरू केला. यावेळी भरधाव वेगाने येणारी हरटिगा कार पोलिसांनी अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हिंजवडी येथे खून व हल्ल्याची घटना केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हिंजवडी पोलिसांचे पथकही आरोपीचा पाठलाग करत उरुळीकांचन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर दिनेश झांबरे याला वाहनासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत उरुळीकांचन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला पळून जाण्यापूर्वीच जेरबंद केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
