|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारात बाह्य कन्सल्टन्सी संस्थांमुळे वाढत चाललेल्या आर्थिक बोजाविरोधात नगरसेवक धर्मपाल बशवंतराव तंतरपाळे यांनी महापौर रविभाऊ लांडगे यांना ठोस निवेदन सादर केले आहे.

मनपाच्या स्थापत्य विभागात सध्या सीईआयएल व पेव्हटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग या दोन बाह्य संस्था कार्यरत असून, त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या स्वतःच्या अभियंत्यांना डावलले जात असल्याची गंभीर बाबही त्यांनी मांडली आहे.

निवेदनानुसार, साध्या रस्त्यांच्या कामांसाठीदेखील संबंधित बाह्य संस्थांची मंजुरी आवश्यक ठरत असल्याने कामकाजात अनावश्यक विलंब होत असून खर्चातही मोठी वाढ होत आहे. पूर्वी आयआरएस व एसजीएस या संस्थांकडून केवळ ०.४० टक्के इतकी फी आकारली जात होती. मात्र सध्या सीईआयएल व पेव्हटेक या संस्था तब्बल १.८०१ टक्के फी आकारत असल्याने मनपावर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित दोन्ही संस्थांचे करार तात्काळ रद्द करून स्थापत्य विभागातील मनपाच्या अभियंत्यांनाच पुन्हा पूर्ण अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी तंतरपाळे यांनी महापौरांकडे केली आहे.

शहराच्या विकासासाठी पारदर्शक व खर्चिक निर्णयांची आवश्यकता असताना, वाढता आर्थिक भार नागरिकांच्या हिताला बाधक ठरत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
