|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात कोयता गँगने पालघन कोयत्याने एका तरुणावर सपासप वार केले.

हा हल्ला इतका भयानक होता की थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू झाला. हल्ला करणारे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव राहुल जाधव आहे. कोथरुड परिसरात दुचाकीवरुन जात असताना त्याच्यावर अल्पवयीन तरुणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्यांनतर आरोपींची टोळी सागर कॉलनीतील गल्लीमध्ये आरडाओरड करत कोयते नाचवत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आरोपींच्या पैकी नसलेल्या एका तरुणाच्या आईसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधांवरुन सर्व आरोपींनी राहुलला जीवे मारण्याचा निर्णय घेतला. कोथरुड परिसरात संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास राहुल सागर कॉलनीमध्ये दुचाकीवरुन जात होता. तेव्हाच आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी राहुलच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. त्याच्या पाठीवरही जखमा झाल्या. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहोचले. पुढे पोलिसांनी राहुलला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणात पोलिसांनी ४ अल्पवयीन तरुणांना अटक केली आहे.
