|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी- चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन जमदाडे यांचे वडील रामदास जमदाडे यांच्या घरी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती समजताच नगरसेविका पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देत जमदाडे कुटुंबीयांची विचारपूस केली. “ काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही होणार नाही, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू,” असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पल्लवीताई वाल्हेकर यांचे पती सुधीर आबा वाल्हेकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. आगीमुळे बाधित झालेले घरातील साहित्य सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न केले. त्यांच्या या तत्पर मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आगीवर तात्काळ नियंत्रण मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. घरगुती विद्युत उपकरणे व वायरिंगची नियमित तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
