|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
चिंचवडे नगर : दगडोबा चौक, चिंचवडे नगर परिसरात झालेल्या वाहनतोडफोडीच्या वाढत्या घटनांनंतर चिंचवड पोलिसांनी अतिशय वेगाने आणि अचूक तपास करून अवघ्या काही तासांत सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्यक्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त केला आहे.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी केले. त्यांच्यासह वाल्हेकर वाडी पोलीस चौकीचे अधिकारी आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.

घटना घडल्यानंतर एसीपी साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे कडक आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहिती यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.

तपासाच्या वेगवान हालचालींनंतर पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. आणखी कोणी आरोपी यात सहभागी आहे का याचीही पडताळणी सुरू आहे.
सलग वाहनतोडफोडीच्या घटनांमुळे अस्वस्थता निर्माण झालेल्या या भागात चिंचवड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी सांगितले की, “पोलिसांनी इतक्या कमी वेळात आरोपी अटक करून आम्हाला दिलासा दिला. चिंचवड पोलिसांचे मनापासून आभार.”

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षा यंत्रणेविषयी विश्वास बळकट झाला असून पुढील काळात अशा घटनांवर अंकुश बसेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
