|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

या सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले. सप्ताहभर पथनाट्य, प्रबोधनपर कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये संत गाडगेबाबा महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालये, शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा, महिला मेळावा, स्वच्छता अभियान आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आले.
अप्पर इंदिरानगर तसेच महाराजस्व अभियान, बिबवेवाडी परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांनी दिली.
समता सप्ताहाची सांगता १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्टी मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य समता रॅली आणि अभिवादन कार्यक्रमाने करण्यात आली. हा संपूर्ण सप्ताह पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांच्या नियोजनाखाली समतादूत किर्ती आखाडे, उषा कांबळे, तेजस्विनी कांबळे, प्रशांत कुलकर्णी, संगीता शहाडे, अनिता दहीकांबळे, शशिकांत जाधव, सचिन कांबळे आणि भारती अवघडे यांनी यशस्वीपणे पार पाडला.