चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरू गणेश बालक मंदिर व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार यांच्या वतीने बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेच्या प्रांगणात ‘दिवाळी पहाट’ या सुरेल संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरेल गीतांची मेजवानी आणि मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अॅड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व प्राचार्य अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी उपस्थितांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दिवाळीच्या आनंदमय वातावरणात सादर झालेल्या विविध सुरेल गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या संगीत मैफलीला तबल्याची साथ रघुवीर, हार्मोनियमची साथ अनिकेत, तर तालवाद्याची साथ ऋषिकेश यांनी दिली. गायिका सौ. पल्लवी, समृद्धी आणि कु. कौशिकी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे निवेदन सौ. स्नेहा यांनी प्रभावीपणे केले.

या सांगीतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी, पालक, आजी-आजोबा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुलकर्णी व सौ. जैन यांनी केले, तर माननीय पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

संगीताचे सुरेल स्वर, उत्साही सहभाग आणि दिवाळीचा आनंददायी माहोल यामुळे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि संस्थेतील घटकांमध्ये स्नेहबंध अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
