|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा ||
गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला.त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला

.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना काल,शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर,२.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज, छत्रपती संभाजीनगर अशी वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

पार्थ जाधव,गोपाल साखरे,स्वप्निल शिरे,पवन सतकार,सुजित देशमुख,शिवम जायभाये,सार्थक पाठक व जुनेद शेख हे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून ते वसतिगृहात वास्तव्यास होते.काल शनिवारी आठही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात मौज-मस्तीसह व्हॉलिबॉल खेळत होते.अशातच पाण्यात गेलेला बॉल पकडण्यासाठी पार्थ जाधव हा धावला.बॉल पुढे व पार्थ मागे धावत होता.बॉलच्या नादात तो खोल पाण्यात बुडाला. त्यानंतर गोपाल साखरे,स्वप्निल शिरे व सुजित देशमुख हे धावले,गोपाल व स्वप्निल पार्थला वाचविण्याच्या प्रयत्नात बुडाले.सुजित देशमुख बचावला.वैनगंगा नदीपात्रात बुडाल्याच्या घटनेने वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
