|| प्रतिनिधी : अरविंद भोंगाळे ||

पुणे : दि. 01 मे 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो (ACB), पुणे यांनी मोठी कारवाई करत लोहगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकाला 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुटे (वय 38) यांनी तक्रारदाराकडून सुरुवातीला 70,000 रुपयांची लाच मागितली होती. ही मागणी वाढवून पडताळणीदरम्यान 80,000 रुपये करण्यात आली. तक्रारदार हा जमीन व्यवहाराचा व्यवसाय करत असून त्याच्याविरुद्ध दाखल अदखलपात्र (N.C.) गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच भविष्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती.

तक्रारदाराने याबाबत 30 एप्रिल 2026 रोजी ACB, पुणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने 80 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर 1 मे 2026 रोजी सायंकाळी 6:47 वाजता लोहगाव पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचण्यात आला. या सापळ्यात आरोपी PSI बरुटे यांनी तक्रारदाराकडून 80,000 रुपये स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Share.
Leave A Reply