|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा ||
गडचिरोली मूल : २७ ऑगस्ट मूलपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील आकापूर लगतच्या राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत बुधवारी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन सहा युवक गंभीर जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की परिसर हादरून गेला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत.

मूल येथील एच.पी. गॅस सिलेंडर विक्रेता ‘संजय फ्लेम एजन्सी’ चे गोडाऊन औद्योगिक वसाहतीत असून, डिलिव्हरी बॉय सिलेंडर वाहून नेण्यासाठी वाहनात चढवित असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई (२०), श्रीराम भगीरथ बिश्नोई (२३), कैलास भगीरथ बिश्नोई (२७), रमेश मोहनराम बिश्नोई (१९), महिंद्र रामरख बिश्नोई (१९) व रतीराम हनुमान बिश्नोई (२५, सर्व रा. जोधपूर, राजस्थान) हे सहा युवक जखमी झाले.

स्फोटानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथील डॉ. कुबेर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडर जमिनीवर पडल्याने स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात गॅस भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर सिलेंडर फेकल्यानेच स्फोट झाला असता, तर डिलिव्हरी बॉय रोजच अशा पद्धतीने सिलेंडर हाताळतात; मग आतापर्यंत अशा घटना का घडल्या नाहीत? त्यामुळे ही दुर्घटना गॅस चोरीशी संबंधित असावी, अशीही शंका व्यक्त होत आहे.

घटनेच्या वेळी गोडाऊनमध्ये सुमारे ३०० सिलेंडर ठेवलेले होते. त्यापैकी कोणत्याही सिलेंडरला आग लागली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेकडो जीव धोक्यात येऊ शकले असते.
या प्रकरणी पोलिसांनी एच.पी. गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व स्फोटक तज्ज्ञांना माहिती दिली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी तपासत आहेत.
