|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||
माढा : “मतदारसंघाच्या विकासासाठी ठेवलेले व्हिजन आता अंतिम टप्प्यात असून, आमदारकी फक्त निधीपुरती मर्यादित मानण्याऐवजी गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करून त्यांना मार्ग काढून देण्याचे काम केले,” असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे माढा शहरात आयोजित कृषी व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. विधानसभेच्या प्रत्येक दिवशी हजर राहून तारांकित, अतारांकित, लक्षवेधी मुद्दे, औचित्याचा प्रश्न, २९३, १९२, ९४, १०१ अशा विविध माध्यमांतून लोकहिताच्या विषयांना पुढे नेल्याचे त्यांनी नमूद केले. एसटी पार्सल सेवा, दुधातील भेसळ, ऑनलाईन गेमिंग अशा थेट सामान्य जनतेशी निगडित प्रश्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मार्ग उपलब्ध करून दिला, हे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.

यावेळी त्यांनी माढा शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य शिवस्मारकाबाबत माहिती दिली. स्मारकासाठी जागेची मोजणी पूर्ण झाली असून दहा कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी आधीच उपलब्ध झाला असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. “या स्मारकासाठी मी स्वतः ११ लाखांची वर्गणी देत आहे आणि नागरिकांनीही सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

तालुक्यातील महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, एक लाख चार हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ९८ हजार शेतकरी अतिवृष्टीसाठी पात्र ठरले असून, प्रशासनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचे काम केले. मतदारसंघातील अनेक नागरिकांना वेळोवेळी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे ही सततची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हास्यविर भाऊ कदम, महागायक आनंद शिंदे, डॉ. निलेश साबळे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे चार दिवसांचा महोत्सव अविस्मरणीय ठरला. “दरवर्षी माढा फेस्टिव्हल भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करू,” अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.

“मी यशवंतरावांच्या विचारांचा पाईक” — आ. अभिजीत पाटील
“शेती करायची असेल तर शेतात जा, समाजकार्य शिकायचे असेल तर समाजात जा… लोकांच्या समस्यांमध्ये जाऊनच खरी लोकसेवा करता येते,” असे सांगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीनेच आपण कार्य करत असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील राजकीय वाटचालीची दिशा अधिक ठळक झाल्याची चर्चा महोत्सवात रंगली.
