|| प्रतिनिधी : राजेश वाइकर ||
रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. माणगाव येथील मुंबई-गोवा महामार्गावरील गुरुकृपा हॉटेलसमोर भरधाव खाजगी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात एका वृद्धाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला असून दोन अल्पवयीन मुलींसह एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 2 जून 2025 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कालिदास बाबुराव कोकरे (रा. कुभारमाट ता मालवण. जि. सिंधुदुर्ग) हा खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कार्यरत असून तो मुंबई येथून खासगी ट्रॅव्हल्स बस घेऊन सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दिशेने निघाला होता. बस माणगाव पोलीस हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या गुरुकृपा हॉटेलसमोर रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आली असता अश्विनी स्वप्निल दळवी (वय 30 वर्षे) या त्यांची मुलगी साईशा स्वप्नील दळवी (वय 4 वर्षे) हिच्यासोबत मावशीचे घरुन जेवन करुन मावस भाऊ अनिल अशोक सोनार यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मामा अशोक भिकु सोनार यांच्या रिक्षाने त्या जात होत्या. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ भरधाव वेगात असलेल्या बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.

या अपघातात अशोक भिकु सोनार (वय 65 वर्षे), परी अनिल सोनार (वय 11 वर्षे) ,अश्विनी स्वप्निील दळवी, साईशा स्वप्नील दळवी हे जखमी झाले होते. अशोक भिकु सोनार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे नेत असताना पेण वडखळ नजिक त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे. यातील आरोपी कालिदास बाबुराव कोकरे याला नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गु. रजि. नं.- ११९/२०२५ भा. न्या. स. क. १२५ (अ), १२५ (ब), २८१ सह. मो. वा कलम १८४ कायद्याप्रमाणे आज पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार हे करीत आहेत.
