|| प्रतिनिधी क्षितिजा देव ||
पुणे : रोज घरी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी येणार्याने घरात कोणी नाही हे पाहून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या पाव विक्रेत्याला अटक केली आहे.

समसाद खॉ (रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) असे या पाव विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत एका ४५ वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता फिर्यादीच्या घरी झाला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समसाद खॉ हा नेहमी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतो. २ मे रोजी फिर्यादी यांच्या १४ व १२ वर्षाच्या दोन मुली घरात होत्या. समसाद हा घरी आला. घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन पाव ब्रेडचे पैसे घेताना त्याने १४ वर्षाच्या मुलीला जवळ ओढून घेतले. तिच्याशी अश्लिल वर्तन केले. तसेच १२ वर्षाच्या मुलीबरोबर त्याने अश्लिल वर्तन केले. या मुलींनी फिर्यादी या घरी आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी समसाद खॉ याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.
