नाशिक : अजून तुझं वय लहान आहे, मोठं झालं की लग्न लावून देतो, असं कुटुंबियांनी सांगून सुद्धा प्रेमात धोका मिळाला म्हणून एक १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी तिच्या १९ वर्षीय प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या शरणपूर रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. मृत मुलगी ही लहानपणापासून बेथेलगनगर परिसरात आपल्या मावशीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी या मुलीची ओळख वेदांत पाटील नावाच्या तरुणाशी झाली. आधी मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मृत मुलीच्या मावशीला मिळाली. त्यानंतर मावशीने मुलीची समजूत काढली. तुझं लग्नाचं वय झालं की दोघांचं लग्न लावून देऊ, असं कुटुंबीयांनी सांगितलं. एवढंच नाहीतर लग्नाचं वय होत नाही तोपर्यंत भेटू नका असंही मुलीला आणि वेदांतला बजावलं होतं. पण दोघेही लपून छपून भेटत होते. पण अशातच तिचा प्रियकर वेदांत प्रवीण पाटील याने मात्र माघार घेतली.

वेदांतने या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. वेदांतचं एका दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचं मृत मुलीला कळालं. याचा तिला मोठा धक्का बसला. त्याने तिला याबद्दल जाब विचारला तर त्याने तिला मारहाण सुद्धा केली. त्याने लग्नाला नकार दिला. तिने ही माहिती आपल्या मावशीला सांगितली. गेल्या महिन्याभरापासून अल्पवयीन मुलगी तणावात होती. अखेरीस आज महिन्याभरापासून सुरू असलेल्या मानसिक त्रास असह्य झाल्याने या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयाला मोठा धक्का बसला. मृत मुलीच्या मावशीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा १९ वर्षीय प्रियकर वेदांत पाटील याला ताब्यात घेतलं आहे.
