जळगाव : जळगावमध्ये ट्रकचालकाकडून 50 रुपयांची लाच घेणं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. ट्रकचालकाला अडवत लाच घेणाऱ्या ट्रकचालकानं 50 रुपयाची नोट पुढं करताच आमची 50 रुपयाची इज्जत आहे का, किमान 100 तरी करा म्हणत हटून बसलेल्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

या व्हिडिओनंतर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी 50 रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्याना निलंबीत केल्याची घटना घडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
कुणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी तैनात असलेल्या पोलिसानेच 50- 100 रुपयांसाठी नियम धाब्यावर बसवून आपला खिसा गरम करणं म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. निलंबीत करण्यात आलेले पोलीस कर्मचारी पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून त्याचे नाव पवन पाटील असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

नक्की घडले काय?
जळगावमधील पाचोरा हद्दीतील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला गाडी बाजूला घ्यायला लावली. आणि कुठली गाडी कुठे चाललात विचारत लाच मागितली.यावर ट्रकचालकानं 50 रुपयांची नोट दिल्यावर किमान शंभर तरी करा.. पन्नास रुपयाची लायकी आहे का आमची असं म्हणत पन्नास चालणारच नाहीत म्हणून संबंधित पोलीस कर्मचारी हटून बसला. दरम्यान, ट्रकवर बसलेल्या एका व्यक्तीने नकळत हा व्हिडिओ केला आहे. पन्नास शंभर रुपयांसाठी खिसा गरम करताना आता सुट्टे नाहीत असे ट्रकचालकाने पोलीस कर्मचाऱ्यास सांगितल्यानंतर त्यानी आधी दिलेली 50 रुपयांची नोट खिशात टाकत पोलीस कर्मचाऱ्यानं ट्रकचालकाला पुढे सोडलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जळगावच्या पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ करणाऱ्या दोन इतर कर्मचाऱ्यांचंही निलंबन केलं आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
