पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे आरोपीचा घृणास्पद डाव फसला असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारच्या सुमारास सोसायटीमध्ये शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन अल्पवयीन मुलींना बोलावले. “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,” असे सांगून त्याने मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले.

तेथे आरोपीने मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, “हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन,” अशी धमकी देत मुलींना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. आरोपीच्या धमकीमुळे मुली हादरल्या होत्या. मात्र, त्यातील एका १० वर्षीय मुलीने घरी पोहोचताच संपूर्ण प्रकार आईला सांगितला. चिमुरडीच्या धाडसामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपी दिनेश चौधरी याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, संबंधित सोसायटीमध्ये कामाचा त्याचा तो पहिलाच दिवस असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापूर्वी तो एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये कार्यरत होता.

सोसायटीच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.






