पिंपरी-चिंचवड : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत सराईत दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची उकल या कारवाईमुळे झाली आहे.

महाळुंगे एमआयडीसी परिसरातील उद्योग व कंपन्यांमधील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तातडीने तपास मोहीम राबविण्यात आली.

१४ एप्रिल २०२६ रोजी पानसे ऑटो प्रा. लि. कंपनीसमोरील पार्किंगमधून एमएच १४ एनसी ६४६३ क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी संदीपकुमार किशोरी सरन निसाद यांच्या तक्रारीवरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने महाळुंगे ते जुन्नर दरम्यान सुमारे ८० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान यश सुनिल हांडे (वय १९, रा. पिंपळगाव सौदा, ता. जुन्नर) आणि किरण संभाजी जाधव (वय २६, रा. टिकेकरवाडी, ता. जुन्नर) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक व अहिल्यानगर परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, यामाहा आर-१५, होंडा शाईन, स्प्लेंडर प्लस, अॅक्टिव्हा, पल्सर २२०, सुझुकी बर्गमन स्ट्रीट आदी विविध कंपन्यांच्या एकूण २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि अहिल्यानगर येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली तसेच चेतन सावंत, युवराज बिराजदार, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, राजकुमार हनमंते, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, शिवाजी मरकड आणि आकाश घाडगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार चेतन सावंत करीत आहेत.

Share.
Leave A Reply