पिंपरी-चिंचवड : वाल्हेकर वाडी, चिंचवडगाव रोड येथील रानमळा हॉटेल समोर बळवंत कॉलनी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) ला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. तसेच, वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

दरम्यान, एमएसईबी कर्मचाऱ्यांबरोबर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आगीची तीव्रता इतकी होती की संबंधित डीपी पूर्णपणे जळून राख झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून अद्याप वीज सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नसून, सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांकडून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version