उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप होत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर आरोप केले आहेत. तब्बल १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली आणि अवघी ५०० रुपये स्टॅम्पड्यूटी भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत आणि तहसीलदार व सहाय्यक निबंधकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान आता या प्रकरणावर पार्थ पवार यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया देत, आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता. त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की, जे काही आता टीव्ही आणि विविध चॅनल्सवर सुरू आहे. त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही. माझा त्या गोष्टीशी थेट अजित पवार म्हणून दुरान्वये देखील संबंध नाही. मला ३५ वर्षे महाराष्ट्रातील जनता ओळखते, त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचं मी ठवरलेलं आहे.”
तसेच ”कारण, मागे एकदा साधारण तीन-चार महिन्यांपूर्वीच गोष्ट असेल, तेव्हा असं काहीतरी चालंलय असं माझ्या कानावार आलं होतं, तेव्हाच मी सांगितलेलं होतं की असलं काहीही मला चालणार नाही. चुकीच्या गोष्टी कुणीही करू नयेत, अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्यानंतर परत काय झालं मला माहीत नाही. परंतु आता चॅनल्सवर वेगवेगळ्या जमिनीसंदर्भात बरच काही सांगितलं जातय, जी इथंभूत माहिती काय कागदपत्रे आहेत, काय नाहीत, कुणी परवानगी दिली.” असं अजित पवार म्हणाले.

याशिवाय ”मी तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या संदर्भात कुठंतरी त्यांना फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा सांगितलेलं नाही. मी यानिमित्त उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगेन, की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल, नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला आज दुपारी कुणीतरी दाखवलं की, मुख्यमंत्री म्हणाले आहेत की याची चौकशी करतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे.” असंही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं.
