आई-वडील मुलांना उघडं-नागडं पाहतात, पण एका मुलाने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहणे तो प्रसंग व्यक्त करायला शब्द नाहीत. २०१६ मध्ये पप्पांना हृदयविकाराचा झटका आला.

बायपास शस्त्रक्रिया सुरु होती. त्या दिवशी मी आठ तास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या सोबत होतो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण होता. त्यांच्या धडधडणाऱ्या काळजावर चाललेली ही लढाई… माझ्यासाठी तो रुग्ण कुणी अनोळखी नव्हता, तो माझा बाप होता. त्या क्षणी एक मुलगा म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून मी तिथे होतो. त्यावेळेला मी बाहेर पडलो असतो तर मम्मी, भाऊ सगळ्यांनी मला प्रश्न केले असते. त्यामुळे पप्पांना या परिस्थितीतून बाहेर काढणे ही माझी जबाबदारी होती. या सगळ्या प्रसंगाने मला एक गोष्ट शिकवली वडील म्हणजे काय? त्यांच्या अस्तित्वाची किंमत फक्त बाप गार झाल्यावर कळते, पण मी ती थरारक क्षणात अनुभवली. पप्पांना हार्ट अटॅक आला, तेव्हा पहिला फोन त्यांच्या ड्रायव्हरने मला केला. तो फोन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट बातमी.
‘तुझ्या या सोन्या चांदिला तव्हा मोल असल का, लावशील ढीग पैशांचा आईबाप दिसल का…’ हे गाणं मी पप्पांना समर्पित केलं असून लवकरच प्रसिद्ध होणार आहे. पप्पांचा मला गायक, संगीतकार, अभिनेता आणि डॉक्टर बनवण्यात मोठा वाटा आहे. आम्ही तिघं भाऊ हर्षद, उत्कर्ष, आदर्श. आमच्यात संगीत रक्तातून आलेलं आहे. बालपणी आमच्या घरी शुक्रवार ते रविवार कवी, लेखक, कलाकारांची मांदियाळी भरायची. हार्मोनियम, तबला, ढोलक यांची मैफल रंगायची. आम्ही भावंडं त्या मैफली ऐकायचो आणि नकळत शिकायचो. इतर मुलांच्या घरी खेळणी असायची, पण आमच्याकडे हार्मोनियम. त्यामुळे आमचं घर हे एक विद्यापीठच होतं.

आई फक्त सातवी शिकलेली आणि पप्पा नववी. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी केलेल्या वाचनामुळे आमच्या घरात शिक्षणाचं वातावरण होतं. ते म्हणायचे, समाजाने आपल्याला खूप दिलंय, त्याचं ते देणं आपण शिक्षणाच्या रूपातच फेडू शकतो. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा’ हा मंत्र त्यांनी आमच्यात रुजवला. त्यामुळे मी डॉक्टर झालो. पप्पांनी कधीही ‘हा माझा मुलगा’ म्हणून आमच्यासाठी शिफारस केली नाही. ते म्हणायचे, स्वतःचा मार्ग स्वतःच शोध. स्वतःची स्टाईल तयार कर. आज लोक माझी ओळख पप्पांमुळे नाही, तर स्वतःच्या कामामुळे करतात हे मला त्यांच्यामुळेच जमलं.
एकदा जोरदार पावसामुळे आमच्या घरात पाणी शिरलं. सगळं भिजू लागलं, तेव्हा पप्पांनी आम्हाला कोणताही महत्त्वाचा कागद, दागिना नव्हे तर हातात हार्मोनियम, तबला व इतर संगीत साहित्य उचलून बाहेर न्यायला लावली. ते म्हणाले, तुम्हाला भविष्यात ज्या गोष्टी घडवणार आहे त्या गोष्टी वर्तमानात जपा. समाजात एक कलाकार म्हणून तुम्ही संवेदनशिल असले पाहिजे याची शिकवनच आम्हाला पप्पांनी दिली. ज्यावेळेला मी मेडिकलला डॉक्टर होण्यासाठी गेलो तेव्हा, माझा शत्रू जरी तुझ्याकडे उपचारासाठी आला तरी त्याच्यावर माणूस म्हणून उपचार करायचे. ही शिकवण मला पप्पांनी दिली. त्यांच्यासाठी माणुसकी, मदतीचा हात हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दागिने आहेत. ते म्हणतात, गाणं आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. एकदा त्यांनी डॉक्टरला म्हटलं, माझा आवाज गेला तर मला वाचवू नका. हे गाण्यावरचं त्यांचं प्रेम, त्यांची तळमळ आजही आम्हाला प्रेरणा देते. पप्पांनी आमचं कधीही उघडपणे कौतुक केलं नाही. पण त्यांचा पाठिंबा, विश्वास हा सदैव भक्कम होता आणि आहे.

“तुमच्या सारखा गायक होणं अशक्य आहे, पप्पा”
पप्पा, तुमच्या सारखा दुसरा गायक या जगात होऊच शकत नाही. तुमचा आवाज हा फक्त आमच्या घरासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अमूल्य देणं आहे. जसं घराला तुमची गरज आहे, त्याहूनही जास्त गरज तुमच्या प्रेक्षकांना आहे. तुमचं गाणं हे लोकांच्या मनाला भिडतं. तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द, प्रत्येक सुर प्रेक्षक डोक्यावर घेतात. आता तुम्ही फक्त आमचेच राहिले नाहीत, तर तुम्ही या महाराष्ट्राचे झाला आहात. म्हणूनच स्वत:ची काळजी घ्या, आणि अजून गाणी गा.
“आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे प्रथम कर्तव्य “
कोणत्याही मुलाने आई-वडिलांचे पहिले स्वप्न पूर्ण करणे हेच त्याचे खरे कर्तव्य असते. एकदा ते स्वप्न पूर्ण झालं, की आपण मोकळेपणाने जगू शकतो. पप्पांचं स्वप्न होतं की, त्यांचा एक मुलगा डॉक्टर व्हावा. मी त्यांचा विश्वास वाया जाऊ दिला नाही. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, पुण्यात दोन दवाखाने सुरु केले. त्यांच्या स्वप्नाचा मी मान राखला. आता मी जेव्हा माझं दुसरं स्वप्न अभिनेता, गायक म्हणून जगतोय.
‘फादर्स डे’ निमित्त संदेश
आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालक स्वत:च्या इच्छा, स्वप्न बाजूला ठेवत आयुष्य झिजवतात. म्हणून आपण मोठे होतो, तेव्हा पहिलं कर्तव्य त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्व देणं असतं. माझ्या मुलाने ते करावं, जे मी नाही करू शकलो हीच त्यांच्या आयुष्याची पूर्णता असते. आपल्याला घडविणाऱ्या आई-वडिलांना सुख देणं, हीच खरी प्रगती आहे.
