पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात आलीय. सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. त्याच दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने एक नवा दावा केलाय.

पर्यटकांवर गोळ्या झाडणं हा दहशतवाद्यांचा प्लॅन बी होता, त्यांचा प्लॅन ए हा फेल झाला होता,. इतकेच नाही तर सुरक्षा यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या रेखाचित्रातील एका दहशतवाद्याला त्यांनी हल्ल्याच्या दोनदिवसाआधीच पाहिलं होतं, असा दावा एका महिलेने केलाय. महिलेच्या या दाव्याने मोठी खळबळ उडालीय.
महिला पर्यटकाच्या म्हणण्यानुसार,त्यांना ज्या व्यक्तीने खेचरवरून फिरवलं होतं. त्याचं बोलणं महिलेनं ऐकलं होतं. तो कोणाशीतरी कोड भाषेत बोलत होता. इतकेच नाही तर त्याने महिला पर्यटकासोबत गप्पा केला होत्या. दोघांमधील संभाषणानंतर तो व्यक्ती कोणाशी तरी बोलताना शस्त्रे, ब्रेक फेल्युअर आणि प्लॅन ए-बी यांचा उल्लेख केला होता.महिलेला त्याने धर्माशी संबंधित प्रश्न केली होती, असा दावा महिलेने केलाय. ही पर्यटक महिला उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहे.

एकीकडे सुरक्षा यंत्रणा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यात व्यस्त असताना, या महिला पर्यटकाने खळबळजनक दावा केलाय. हल्ल्याच्या आधी २० एप्रिल रोजी, जेव्हा त्या बैसरन व्हॅलीला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा स्केचमध्ये दिसणाऱ्या एका संशयिताने तिला खेचरावर फिरवलं होतं, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिलीय.
महिला पर्यटकाचा दावा आहे की, त्या काळात या संशयितांनी तिला अनेक विचित्र प्रश्न विचारले, ज्यात धर्म, धार्मिक स्थळांना भेट देणे आणि मित्रांच्या धार्मिक ओळखीशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. दरम्यान या महिला पर्यटकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात संशयित दहशतवादी दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीने मरुन रंगचा जॅकेट आणि पायजामा घातलाय.

खेचरवरून सवारी करत असताना त्या व्यक्तीने महिलेला काही प्रश्न केली होती. त्यात अजमेर किंवा अमरनाथ यात्रेबाबत प्रश्न होती. त्याने महिलेला विचारलं की, तिने अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे का नाही याची विचारणा केली. त्यावरून तिने सांगितलं की, यात्रेसाठी नोंदणी केली नाही. तेव्हा संशयित म्हणाला, नोंदणी करू नका, फक्त तारीख सांगा आणि आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येईल.
या संभाषणादरम्यान, जेव्हा महिला पर्यटकाने त्या माणसाला त्याचा फोन नंबर विचारला तेव्हा त्याने सांगितले की त्याचा फोन निरुपयोगी आहे.त्याच्या आवाज ऐकू येत नाही. त्यानंतर लगेच त्याला कोणाचा तरी फोन आला.
‘प्लॅन ए ब्रेक फेल’, ‘प्लॅन बी ३५ बंदूका पाठवल्या
त्या फोन कॉलवर बोलातना त्या व्यक्तीने प्लॅन ए आणि प्लॅन बीचा उल्लेख केला होता. कोडेड भाषेत तो बोलत होता. फोनवर बोलताना त्याने ‘प्लॅन ए अपयशी झाल्याचं म्हटलं. तर प्लॅन बी नुसार, गवतामध्ये लपवलेल्या ३५ बंदुका मी पाठवल्या आहेत.’ त्या व्यक्तीचं बोलणं महिला ऐकत होती. जेव्हा त्या व्यक्तीला जाणवलं की, महिला आपलं बोलणं ऐकत आहे, तेव्हा त्याने स्थानिक भाषेत बोलणं सुरू केलं. महिलेच्या या दाव्यामुळे खळबळ उडलीय.
