भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 पासून सुरू असलेला सिंधू जल करार तात्काळ स्थगित करण्यात आल्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या या निर्णायक कृतीने पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या पाण्याच्या स्त्रोतांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तेथील सरकार अडचणीत येऊ शकते.

पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारचा जलप्रहार
मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 2 विदेशी पर्यटकांचा समावेश होता. 17 जण गंभीर जखमी झाले. पुलवामानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेने ‘द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)’ ने स्वीकारली आहे.
मास्टरमाईंड सैफुल्लाहचा पलटवार – “मी तो नाही!”
या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालिद कसुरी असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिली होती. मात्र भारताच्या कडक भूमिकेनंतर, सैफुल्लाहने स्वतःच व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो घाबरलेला स्पष्ट दिसत असून त्याने हल्ल्याची निंदा केली आहे. तो म्हणतो, “हल्ल्यात माझा काहीही सहभाग नाही. भारताने माझ्यावर खोटा आरोप लावला आहे आणि पाकिस्तानवरही बोट ठेवले आहे. हे दुर्दैवी आहे.”
सिंधू जल करार थांबवल्याने वाढली चिंता
सैफुल्लाहने भारताच्या सिंधू जल कराराच्या निर्णयाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. “भारत पाकिस्तानचा पाणी पुरवठा थांबवून देशाला उध्वस्त करू पाहत आहे.” अशा प्रकारची विधाने करत त्याने भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. “भारत जम्मू-काश्मीरमध्ये 10 लाख सैनिक तैनात करून आता पाकिस्तानाचीही शांतता उध्वस्त करू पाहतो आहे,” असा गंभीर आरोपही त्याने केला.
सैफुल्लाहची आंतरराष्ट्रीय स्तरावर गयावया
या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह खालिदने आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताविरुद्ध भूमिका घेण्याची विनंती केली आहे. “भारताच्या बाजूने डोळे झाकून उभं राहण्याऐवजी सत्याला साथ द्या,” असं आवाहन करत त्याने पहलगाम हल्ला भारतानं स्वतः रचलेली एक साजिश असल्याचा आरोप केला. “या हल्ल्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही,” असा दावाही त्याने केला आहे.
