पुणे : न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर आणि सही मुंबई उच्च न्यायालयात सादर करून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवल्याची घटना न्यायव्यवस्था हादरून टाकणारी आहे.

मात्र खोटी सही करून न्यायालयाची दिशाभूल करणारे आरोपी अजूनही मोकाट कसे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला, जेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला खरा मात्र पुण्यातील संबंधित पोलिस ठाण्यात या आरोपींना पुन्हा अटक का नाही झाली? हा सुद्धा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित होतोय.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्ह्यातून वगळले आहे, असा बनावट आदेश उच्च न्यायालयात सादर करत आरोपींनी जामीन मिळवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. पुण्यातील न्यायाधीशांनी ही ऑर्डर मी केलीच नसल्याचं आणि ती सही देखील माझी नसल्याचं सांगितल्यावर हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचं समोर आलं.

५ मार्च रोजी जेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ आरोपींचा जामीन रद्द केला. या बनावट अर्जाची दखल घेत उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपींचा जामीन रद्द करत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या घटनेला आज जवळपास १० ते १३ दिवस झाले असून तरी सुद्धा पुणे पोलिसात अद्याप न्यायाधीशांच्या बनावट सही आणि बनावट निकालपत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
दुसऱ्या बाजुला, ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने जमीन रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर आज १७ मार्चपर्यंत जामीन रद्द झालेल्या आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक का नाही केली? असा प्रश्न सुद्धा आता संबंधित प्रकरणातील वकील अँड. प्रशांत पाटील यांनी उपस्थितीत केला आहे

जामीन रद्द झाल्यापासून आज १३ दिवस उलटून गेलेत. या दरम्यान, आरोपींनी केलेल्या कृत्याचे पुरावे त्यांनी नष्ट केले नसतील का? शिवाय या प्रकरणात काही पैशांची देवाणघेवाण झालीय का? त्याबाबत सुद्धा तपास यंत्रणांनी करायला हवा, अशी मागणी प्रशांत पाटील यांनी केली आहे. यासाठी कंपनीने सुद्धा पुणे पोलिस आणि लाचलुचपत विभागात तक्रारी अर्ज दाखल केला आहे
