कोल्हापूर : व्यवसायासाठी भावाला दिलेली २६ लाखांची रक्कम परत मागितल्याच्या रागातून दीपाली अरविंद पाटील (वय ३५, भायखळा, मुंबई) यांना सख्ख्या भावाकडून मारहाण करण्यात आली.

तसेच त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून पळाल्याप्रकरणी फिर्यादीचा भाऊ श्रीनाथ अरविंद पाटील (वय २८, ब्रह्मपुरी, कागल) याला पोलिसांनी (Police) अटक केली.
संशयित श्रीनाथ पाटील हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याची नोकरी लागेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यासाठी बहिणीकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले होते. ही रक्कम २६ लाख ३८ हजार रुपयांच्या घरात गेली. ही रक्कम त्याने ॲग्रो कंपनी (Agro Company), फूड कंपनीमध्ये गुंतवल्याचे तो सांगत होता.

मात्र, त्याने कोणताच व्यवसाय सुरू न केल्याने बहीण दीपाली पाटील यांनी त्याला दिलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या श्रीनाथ पाटील याने दीपाली यांना शिवीगाळ, मारहाण केली. ‘पैसे परत मागितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही,’ असे धमकावले.
तसेच त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉपही चोरून नेला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित श्रीनाथ पाटीलला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे तपास अधिकारी क्रांती पाटील यांनी सांगितले.
