पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी परिसरात कार रस्त्यात का थांबवली, याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे संचालक व प्रशिक्षक यांना मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शरद सुभाष भोसले (वय ३५, रा. ग्रीन पार्क सोसायटी, जिजामाता चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राजू शिंदे (वय २२), प्रविण बडे (वय २४), सागर अनिल गावडे (वय २६), हितेश सुधीर चौधरी (वय २२) आणि तेजस हगवणे (वय २०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वाल्हेकरवाडी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शरद भोसले यांनी आरोपींना कार रस्त्यात का थांबवली आहे, अशी विचारणा केली होती. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून ठोसे व बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत भोसले किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, भोसले यांना सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील काही विद्यार्थ्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), १८९, १८९(१), १८९(२), १९०, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीप हे करीत आहेत.






