|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||

पिंपरी-चिंचवड : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी दुपारच्या सुमारास संबंधित बालक घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, शेजारील एका खोलीत पिशवीत बालकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक तपासात बालकावर अत्याचार करून त्याची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. या गंभीर गुन्ह्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. तपास पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी हा बिहार येथील अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातून ताब्यात घेतले. तो राज्याबाहेर पसार होण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि भास्कर पुल्ली, पोउपनि पिंजारी, जायभाये तसेच अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शदर खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, योगेश तिडके, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड यांच्या पथकाने पार पाडली.

Share.
Leave A Reply