|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वाल्हेकरवाडी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, उलट बांधकामे अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इमारती उभारल्या जात असून, त्यातील फ्लॅट विक्रीही सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बांधकामांकडे संबंधित विभाग, बीट मार्शल व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

गोरगरीबांवर कारवाई, मोठ्यांना मोकळे रान

सामान्य नागरिकांनी लहान शेड टाकले किंवा किरकोळ बांधकाम केले तरी तात्काळ नोटीस व कारवाई केली जाते; मात्र कोट्यवधींच्या इमारती उभारताना प्रशासनाचे डोळेझाक का, असा संतप्त प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. वरिष्ठांना दाखवण्यासाठी केवळ किरकोळ कारवाया करून मोठ्या बांधकामांना अभय दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

संगनमताचा संशय तीव्र

मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे कोणत्याही प्रशासकीय पाठबळाशिवाय शक्य नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित अधिकारी व बांधकाम व्यावसायिक यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळेच कारवाई टाळली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, सर्व अनधिकृत बांधकामांवर समान न्यायाने कारवाई व्हावी आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या गंभीर प्रकारामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता आयुक्तालय या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version