|| प्रतिनिधि : आशुतोष कातवरे ||
पिंपरी-चिंचवड – पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत देहूरोड परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जड वाहनांना बंदी असतानाही हा अपघात घडला. डंपर चालक मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव दीपाल बहादूर साई (वय ३२, रा. विकासनगर, देहूरोड) असे आहे. अपघातानंतर डंपर चालक प्रदीप मयूर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास (९.३० वाजता) किवळे येथील सईद द्वारका हौसिंग सोसायटीसमोर ही दुर्घटना घडली. दीपाल बहादूर साई हा खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. कामावर जात असताना डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, साई यांचा जागीच मृत्यू झाला.

जड वाहनांवर बंदी असतानाही वाहतूक
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते १० या वेळेत जड वाहनांना बंदी आहे. तरीदेखील या वेळेत डंपर महामार्गावर धावत होता. याआधीही हिंजवडी परिसरात अशाच अपघातानंतर संबंधित चालकावर गैरइच्छेने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बन्सोडे यांनी सांगितले की, “हा अपघात रविवारी सकाळी झाला असून आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.”

या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, बंदी असतानाही जड वाहनांना परवानगी कशी मिळते, यावर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
