पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी – प्रभू कांगणे ) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धडक कारवाई करत सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. या आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि ही कारवाई करण्यात आली.
आरोपीचे नाव ऋषीकेश अर्जुन माळी (वय 22, रा. महाळुंगे) असे असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

२४ ऑगस्ट रोजी पथकाने आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर पुढील तपासात २५ ऑगस्ट रोजी त्याच्याकडून आणखी एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे ५२ हजार रुपये) हस्तगत करण्यात आली. अशा प्रकारे एकूण दोन पिस्तुलं व चार जिवंत काडतुसे पोलिसांच्या ताब्यात आली आहेत.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गुळीग, देवकाते, तसेच अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम, एएसआय खांदे, लोखंडे, सोमनाथ मोरे व गणेश हिंगे यांनी संयुक्तरीत्या केली.
