|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी चिंचवड : 15 जून 2025 रोजी दुपारी चिंचवडे नगर परिसरात एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भयानक होती की तिच्या आहारी शेजारील फर्निचर दुकान, डेकोरेशनचे गोडाऊन आणि काही अंतरावर असलेली रहिवासी इमारतही आली. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व उष्णता निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीचा भडका इतका प्रचंड होता की काही रहिवाशांना घाबरून पहिल्या मजल्यावरून उड्या माराव्या लागल्या. महिलांनी व घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील सिलेंडर, फ्रीज, वायरींग व महत्त्वाचे साहित्य तातडीने बाहेर काढले. यामुळे मोठी जीवितहानी टळली, परंतु शेकडो नागरिकांच्या जिवावर बेतलेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती.

शेखर अण्णा चिंचवडे यांचे तात्काळ प्रत्युत्तर
या संकटाच्या वेळी शेखर अण्णा चिंचवडे यांनी दाखवलेली तत्परता ही खरोखरच उल्लेखनीय ठरली. आग लागल्याचे समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक दलाला फोन करून आग माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे अग्निशामक दलाच्या १० गाड्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाल्या.
शेखर अण्णांनी केवळ माहिती देऊन थांबले नाही, तर घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून अग्निशामक जवानांना मदत केली. त्यांनी खास जेसीबी मागवून घटनास्थळावरील प्लास्टिक व धोकादायक साहित्य दूर सारले, जेणेकरून पाण्याचा मारा थेट आगीवर करता येईल. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया आणि मागणी
चिंचवडे नगर हा परिसर घनदाट वस्ती असलेला असून, येथे भंगार व्यवसाय चालवणे अत्यंत धोकादायक आहे, हे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी नगरपालिकेवर व पोलिस प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
“आज काही जीवितहानी झाली नाही हे नशिबाने, पण उद्या कुणाचा जीव गेला तर जबाबदारी कोण घेणार?” – असे सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले.या घटनेनंतर नागरिकांनी एकमुखाने मागणी केली की, या भंगार व्यवसायिकावर कठोर कारवाई करून दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे”.
