|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मटन मार्केट ते अंबाबाई पटांगण दरम्यानच्या नवीन पुलावर रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नारायण कोंडीबा बुरांडे (रा. तारापूर) हे आपल्या गावाकडे जात असताना गाडीचा कट घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या डिझेल टँकरच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.

या अपघातात त्यांच्यासोबत असलेली एक तरुणी देखील जखमी झाली असून तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी पाऊस सुरू होता. मोठ्या पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने शव वाहक वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकले नाही.

डिझेल टँकर सोलापूरहून पंढरपूरकडे येत असताना अंबाबाई पटांगण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक कोळी समाजातील नागरिकांनी सांगितले की, मटन मार्केट ते अंबाबाई पटांगण या मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने अपघात वारंवार घडतात. प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
