|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
चिंचवडे नगर : दगडोबा चौक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज शेखर अण्णा चिंचवडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत त्यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

शेखर अण्णा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांच्याकडे वैध लायसन्स आहे आणि जे विक्रेते दगडोबा चौक परिसरातच राहतात, त्यांनीच येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करावा. शिवनगरी , बिजलीनगर, वाल्हेकर वाडी या परिसरातील व्यक्तींनी आपल्या-आपल्या भागातच व्यवसाय करावा.

त्यांनी सांगितले की, “जर प्रत्येकाने आपल्या भागातच व्यवसाय केला, तर कोणत्याही कुटुंबाला त्रास होणार नाही. उलटपक्षी, प्रत्येक भागात विक्रेत्यांना संधी मिळेल व स्थानिक नागरिकांनाही सहजपणे भाजीपाला उपलब्ध होईल. यामुळे परस्पर हितसंबंध जपले जातील आणि स्थानिक पातळीवर सुसंवाद व शांतता टिकून राहील.”

तसेच, त्यांनी उपस्थित विक्रेत्यांना सुचवले की, “एका व्यक्तीमुळे सगळ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. जो ज्या परिसरात राहतो, त्याने तेथेच गाडी लावून व्यवसाय करावा. एका घरातून एकच व्यक्ती भाजीची गाडी लावावी, जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.”
शेखर अण्णा यांनी नागरिकांना इशाराही दिला की, जर नियमांचे उल्लंघन झाले तर महानगरपालिका कारवाई करेल आणि ती कारवाई टाळता येणार नाही. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे आणि परिसरात शांतता राखावी.

या संवादामुळे उपस्थित विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.
