पुणे : मागील चार दिवसांपासून पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरु आहे. पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दौंड तालुक्याप्रमाणे पुण्यातील इतर ठिकाणीही पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. विशेषत: भिगवण येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाण्याचे तळे साचले आहे. अंदाजे तीन किलोमीटरपर्यंतचा सर्विस रोड पाण्याखाली गेला आहे.

मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह आसपास मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नेहमीपेक्षा १२ दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
दरवर्षी जून महिन्यामध्ये मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये आगमन होते. पण या वर्षी १२ दिवसांपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. जून ऐवजी मे महिन्यातच मान्सूनची एन्ट्री झाली आहे. मान्सूनच्या एन्ट्रीपूर्वी राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आहे.
