|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड – चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे ११ मे २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणीवर दोन अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केला. १७ वर्षे ९ महिन्यांच्या मुलीवर तिच्या राहत्या घरासमोर अॅक्टीव्हा गाडीतून येऊन गळा, पाठ आणि हातावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ वाय.सी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२५ भा.दं.वि. कलम १०३, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
चोख तपास करत फक्त २४ तासांत पोलिसांनी आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे उदयभान बन्सी यादव (वय ४२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) व अभिषेक रणविजय यादव (वय २१, रा. सादिकपूर, जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश – सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी आहेत.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय चौबे, अपर आयुक्त श्री. वसंत परदेशी, उपायुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त श्री. सचिन हिरे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव व पो.उ.नि. अजित दुघे यांनी केले. त्यांना पो.ह. सुनिल आंब्रे, पो.ना. तुषार गेंगजे, पो.शि. रोहीत पिंजरकर, पो.शि. प्रितम फरांदे आणि पो.शि. पांढरे यांनी सहकार्य केले.
तपास सुरू असून, अधिक माहिती पुढील कारवाईनंतर समोर येण्याची शक्यता आहे.
