|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पुणे : पहाटेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने नवले पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवरील पडली. ही कार नेमकी सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या दुचाकीवर पडली. त्यात दुचाकीवरील सहप्रवासी याचा मृत्यु झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे मर्सिडीज कारमधील एअरबॅगमुळे चालक व इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.


कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) असे मृत्यु पावलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. प्रज्योत दीपक पुजारी (वय २१, रा. चिंचवड) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी मर्सिडीज चालकासह त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मर्सिडीज चालक शुभम भोसले (रा. पिपंरी चिंचवड) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे मेडिकल चाचणीत आढळून आले आहे. तसेच त्याच्या सहकाऱ्यालाही पोलिसांनी मेडिकलसाठी नेले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज कारमध्ये एकूण चार जण होते. ते कात्रजकडून पिंपरी चिंचवडकडे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जात होते. कारचालकाचे अतिवेगामुळे व मद्य प्राशन केले असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारने नवले पुलावरील बॅरिकेट तोडून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर कोसळली. त्याचवेळी सर्व्हिस रोडवरुन सप्लेंडर कारवरुन दोघे जण जात होते. ही कार नेमकी दुचाकीवर वरुन आदळली. त्यात दुचाकीवरील सह प्रवासी कुणाल हुशार याचा मृत्यु झाला तर चालक प्रज्योत पुजारी हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. कारमधील एअरबॅग उघडल्याने त्यातील चारही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून मर्सिडीज कारचालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
