|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||
पुणे : बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीला ठोकर मारल्याची घटना रविवारी (१६ मार्च) पहाटे एनआयबीएम रस्त्यावर घडली. या धडकेमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणी जखमी असल्याची माहिती नाही.

याप्रकरणी दुचाकीचे मालक सोहेल शफिक शेख (वय ३३, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालक क्षतिज राकेश मंगला (वय ३०, रा. मोहंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी सोहेल शेख कोंढवा येथे राहण्यास आहेत. ते दुचाकीवरून दूध पार्सल करण्याचे काम करतात. रविवारी पहाटे ते दूध पार्सल घेऊन निघाले होते. पहाटे चार वाजता त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील सनश्री सुवर्णयुग या सोसायटीजवळ आपली बर्गमान दुचाकी (एमएच १२ व्हीके ३३३८) पार्क केली होती. या पार्क केलेल्या दुचाकीला किया कार (एमएच १२ टीके १४६३) या चारचाकी वाहनाच्या चालकाने भरधाव वेगाने कार चालवून पाठीमागून ठोकर मारली. ठोकर मारून चारचाकीचा चालक भरधाव वेगात तिथून निघून गेला. त्यानंतर दुचाकीचे चालक शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शहरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक गस्त आणि कठोर दंडात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
