|| प्रतिनिधी : प्रभु कांगणे ||
पुणे : सिक्युरिटी गार्डने सोसायटी मध्ये येताना एंट्री करायला सांगितल्याच्या कारणावरुन त्याचा साथीदार असलेल्याने खुन करुन पळून गेला होता.

२६ मे २००९ मध्ये रहाटणी येथे झालेल्या या खुनानंतर आरोपी तब्बल १६ वर्षे फरार होता. पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने गोवा येथून जेरबंद केले.
सुनिल अशोकराव कांगणे (वय ३९, रा. ओल्ड हेजिटेज मंगल कार्यालय, आकसी मार्केटजवळ सुलाभट, गोवा, मुळ रा. हिब्बट, पो. मोटरगा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. घटना घडली तेव्हा सुनिल कांगणे हा २८ वर्षाचा होता. त्याने सुभाष सोपान धाकतोंडे (वय ५५, रा. सिद्धार्थनगर, राहटणी) यांचा खुन केला होता.

सुभाष धाकतोंडे आणि सुनिल कांगणे हे दोघे एकाच खासगी सिक्युरिटी एजेन्सीमध्ये कामाला होते. पिंपळे सौदागर येथील दीपमाला सोसायटीत दोघांची ड्युटी होती. कांगणे याने रात्रपाळी केली होती. सकाळी त्याने सुभाष धाकतोंडे यांना चार्ज दिला व तो बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला. तो त्याच सोसायटीच्या परिसरात रहात होता. धाकतोंडे यांनी त्याला एंट्रीची रजिस्टरमध्ये नोंद करुन मगच आत प्रवेश कर, असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. ड्युटी संपवून धाकतोंडे हे घरी जात असताना रहाटणी जवळ रात्री ९ वाजता सुनिल अशोकराव कांगणे याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात धाकतोंडे यांचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर सुनिल कांगणे हा फरार झाला होता.
२००८ पासून हा गुन्हा आरोपी न सापडल्याने प्रलंबित होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या गुन्ह्याची माहिती घेत समांतर तपास सुरु केला. सुनिल कांगणे हा गुन्हा केल्यापासून त्याच्या मुळगावी न रहता वेगवेगळ्या राज्यात जाऊन लपवून रहात होता. तो सध्या गोवा येथे राहण्यास आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक गोव्याला रवाना झाले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोहाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांनी केली आहे.
