पिंपरी, दि. ३० : चिखली पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन सराईत आरोपींना अटक करून पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अन्य चार गंभीर गुन्ह्यांमध्येही पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चिखली पोलिसांनी राज संतोष बापर्डेकर (वय २३, रा. शिवपार्वती हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली दिली.

या तपासात चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा क्रमांक ४१०/२०२६, ४९८/२०२६, ४७२/२०२६, ४७४/२०२६ आणि ३२२/२०२६ असे एकूण पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली व एक ऑटो रिक्षा असा एकूण २.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी राज संतोष बापर्डेकर हा रेकॉर्डवरील सराईत वाहनचोर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी वाहनचोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत.

तसेच शंकरसिंग समंदरसिंग टाक हाही सराईत गुन्हेगार असून तो हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, आर्म अॅक्ट तसेच इतर गंभीर कलमांचा समावेश आहे.

सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share.
Leave A Reply