पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर सांगवी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० सप्टेंबर रोजी एकूण १० गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यापैकी ९ ते १० गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित मंडळांकडून वापरण्यात आलेली ध्वनीवर्धक यंत्रणा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या कारवाईमध्ये ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर आणि १ डीजे सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पीकरसह) असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे मालक आणि चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरून ध्वनी प्रदूषण करू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी मंडळांच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन लेखी स्वरूपातही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी थेट कारवाई केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसराज तेली आणि पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेच्या डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच संबंधित डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर व डीजे कन्सोल जप्त करण्यात येणार असून, संबंधित मंडळांचे पदाधिकारी व आयोजक यांना यासाठी जबाबदार धरले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
