चिंचवड : चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम साइटवरून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत संबंधित कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी कामगाराने घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

मृत कामगाराचा मृतदेह पुढील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
