पंढरपूर (प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे): वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका व्यापाऱ्याने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खाजगी सावकारी अधिनियम, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश कांबळे (व्यवसाय – चप्पल दुकान, वाखरी) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये लुंगीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येनंतर त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत सावकारांची नावे लिहिलेली आढळली.

त्यामध्ये भारत हिलाल (रा. पंढरपूर), विकी अभंगराव, बंडू भोसले, शिवाजी गाजरे, गायकवाड आणि संजय व्यवहारे अशी नावे नमूद आहेत. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सावकारांकडून गोरगरीबांना व्याजाने पैसे देऊन त्यांची दुप्पट वसुली केली जाते, तरीही त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर सावकारांविरोधात पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
