पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : शुभम जाधव ) : शहरातील चापेकर चौक येथील नायट्रो जिममध्ये व्यायाम करताना एका ३७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव असून, ते नियमितपणे जिममध्ये व्यायामासाठी येत असत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास मिलिंद कुलकर्णी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्या. काही क्षणांतच ते खाली कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी ते मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, कुलकर्णी यांच्या पत्नी या स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर आहेत. आरोग्यविषयक संपूर्ण माहिती असूनही पतीचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यासारख्या घटनांमुळे व्यायाम करताना आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
